महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महारष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. माझी शेवटची निवडणूक आहे, असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित? असे उदगार शरद पवार यांच्या बदल केले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या या वक्तव्यावरून अजित पवार यांच्या विरोधात राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतं आहे. या विधानावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.
बारामतीत बोलताना अजित पवारांना हद्दच केलीये. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का? अजितदादा… असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. त्यांचं हे वक्तव्य माणुसकीला शोभणारं तरी आहे का? याचा विचार त्यांनी स्वत: करावा, असंही आव्हाड म्हणतात. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील. ते शरद पवार आहेत, त्यांचा शेवट नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहतील, असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली.
आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत अन् तुम्ही कुठंय ते पाहावं. देशातील अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा मोठ्या व्यक्ती देखील शरद पवारांचं नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची… असं म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच नाही तर आता काँग्रेसने देखील अजित पवारांना पट्टीत घेतलंय. काकांच्या भरोशावर जे मोठे झाले त्यांनी काकाला शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना भावनिक विचार करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांना दिला आहे.