पुन्हा जलकुंभी वाढली, मोर्णेचे सौंदर्यीकरणाकडे लोकप्रतिनिधींची पाठ
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेकवेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहेत. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे अडकली असून महापालिका सुद्धा जलकुंभी काढण्याची तसदी घेत नसल्याची परिस्थिती आहे.
मोर्णा नदीच्या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच पाठ फिरविली आहे. मोर्णा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचा डीपीआरही तयार केला होता. या डीपीआरला राज्यस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असून मंजुरी प्रक्रियेतच आठ ते दहा वर्षे उलटली आहेत. अशा स्थितीत सुशोभीकरणासाठी किती वर्षे लागतील, हे सांगता येत नाही.
अकोला महानगरपालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही मोर्णा नदीच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याची परिस्थिती आहे. परिणामी मोर्णा नदीला पुन्हा जलकुंभीने वेढले आहे. यामुळे खुप मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ति होत असुन नागरिकांना मलेरिया, टाइफेड, हिवताप आदि आजाराला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मोर्णा नदीपात्राच्या सौंदर्यीकरण साठी प्रयत्न केले होते. व मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून मोर्णा स्वच्छ मिशन अभियान राबविले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मोर्णा मिशन अभियानाचे कौतुक आपल्या मन की बात या कार्यक्रमात केले होते. मात्र, देखभाल व दुरुस्ती अभावी या सौंदर्यीकरणाची वाट लागली असून महानगर पालिका प्रशासनही याकडे ढुंकूनही पहायला तयार नाही.
म्हणुन परत मोर्णा मिशन अभियान राबविण्याची गरज असुन जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने लवकरात लवकर मोर्णा नदिमधील जलकुंभी काढण्यात यावी. अन्यथा जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी मा. अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ता शंकरभाऊ कंकाळ उपस्थित होते