पल्लवी मेश्राम उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे नागपुर शहरात पोलिसाचा धाक आहे की नाही असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. 3 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास एका दारूच्या नशेत मद्यधुंद असलेल्या वाहन चालकाने चक्क पोलिस शिपायाला शिवीगाळ करीत, त्याला कारने फरफटत नेले. ही धक्कादायक घटना बजाज नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लक्ष्मीनगर ते बजाज नगर चौक परिसरात घडली.
अमित वसंतराव मून वय 30 वर्ष असे पोलिस अमंलदाराचे नाव आहे तर आशिष प्रेमकुमार तेवर वय 27 वर्ष, रा. केटीपीएस कॉलनी कोराडी व अनुज श्रीनिवास बुरागोनी वय 24 वर्ष, राह. परमानंद ले-आऊट कोराडी अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांची एक टीम शनिवारी रात्री गस्तीवर होती त्यात पोलिस अमंलदाराचे अमित मून हे पण त्यात होते. यावेळी आरोपी आपल्या MH- 40-BJ-5321 या क्रमांकाच्या कारने लक्ष्मीनगर चौकातून दोघे जात होते. त्यापैकी एकाने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर कारचा वेग वाढवून ते पसार झाले. काही वेळाने दोघे कार घेऊन परत आले. पुन्हा अमित यांना शिवीगाळ केली. त्यामुळे अमित यांनी बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तसेच अमित व राजेश यांनी कारचा पाठलाग सुरू केला. मातृसेवा सेवा संघासमोर पोलिसांना कार थांबलेली दिसली.
त्यामुळे पोलीस कर्मचारी अमित व राजेश कार जवळ गेले. कारचालकाच्या सिटवर एक जण सिटबेल्ट लावून बसला होता तर दुसरा बाहेर लघुशंका करीत होता. अमित यांनी दरवाजा उघडून सिल्ट बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडीचा वेग वाढवून अमित यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्ता दुभाजकावर आदळली.
सुदैवाने अमित यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, कारचालक किरकोळ जखमी झाला. याचदरम्यान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. दोघांना ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यावेळी अनुज हा दारू प्यायलेला आढळला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले.