🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरुन असल्याने त्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ११ रोजी रात्रीच्या सुमारास देवळी तालुक्यातील पाथरी गावात उघडकीस आली. या घटनेने पाथरी गावावर शोककळा पसरली. सार्थक बाळकृष्ण घोडाम (९) असे मृतक बालकाचे नाव आहे.
मृतक सार्थक घोडाम हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याची गावात शोधाशोध केली. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. तेवढ्यातच कुटुंबियांना गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ नवीन इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ सार्थकचा जोडा आढळून आला. अखेर त्याच खोदलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अंगणवाडीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरले आहे. त्याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पोलीस पाटील संजय चरडे यांनी याबाबतची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री १० वाजताच्या सुमारास सार्थकचा मृतदेह पाण्याने तुडूंब भरलल्या खड्ड्यातून बाहेर काढला. पुढील तपास अल्लीपूर पोलीस करीत आहे.