मुंबई शहर प्रतिनिधी
प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि युती मध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षात जागावाटप झालं असून तीनही पक्षांमध्ये कोणताही वाद नसल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या बैठकी नंतर केला होता. या बैठकीला 24 तास पूर्ण होत नाहीत तोच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघा वरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षा मधून उमेदवारी देण्यावर काँग्रेस नेते आग्रही आहेत, मात्र शाहू महाराज यांना शिवसेना ठाकरे पक्षातून लढले तरच जागा सोडण्याची शिवसेनेची तयारी आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेटही घेतली आहे, त्यामुळे आता कोल्हापूरच्या जागेचा वाद शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, सातारा, बारामती, हातकणंगले (राजू शेट्टी), सांगली या सर्वच जागांवर काँग्रेसचा दावा असल्याने शिवसेना ठाकरे पक्षात नाराजी आहे. कोल्हापूर शिवसेनेला देण्यात आलं नाही तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात एकही सभा न घेण्यावर ठाम असल्याचा इशाराही देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
कोल्हापूरची जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीतले 3 ही पक्ष आग्रही आहेत, पण तिघांचंही शाहू महाराजांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतंय. या भागामध्ये काँग्रेसचे पाच आमदार आहेत. काँग्रेसची संघटना असल्यामुळे शाहू महाराज काँग्रेस कडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांची भेट घेतली होती.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? :मुंबईमध्ये शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर महाविकासआघाडीची बैठक पार पडली, या बैठकीत तीनही पक्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट 21 जागा, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 09 आणि मित्रपक्षांना 3 जागा असा हा फॉर्म्युला ठरला आहे.