अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 4 मार्च:- सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील एका इसमाचा मृतदेह गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत आढळला. एकच खळबळ माजली आहे. सोमेश्वर कुडे वय 45 वर्ष रा. वाकीपुरा पाटणसावंगी ता. सावनेर असे या मृतदेह आढळलेल्या इसमाचे नाव आहे. तो गुरुवार दि. 29 फेब्रुवारी पासून बेपत्ता झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवार दि.29 फेब्रुवारी ला दुपार पासून येथील वाकीपुरा परिसरात राहणाऱ्या व व्यवसायाने शेतकरी असलेला सोमेश्वर कुडे हा कुणाला न सांगता कुठेतरी निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबाने ते हरविल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी, शेजारच्या लोकांनी व मित्र मंडळींनी संपूर्ण ठिकाणी त्याचा शोध घेतला असता त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.
3 मार्च ला 12 वाजताच्या दरम्यान गावालगत असलेल्या संतोष बंड यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना एक इसमाचा मृतदेह येथील गोपालक उमेश कश्यप यांना दिसला. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना कळविले. विहिरीत मृतदेह आढळताच तो बेपत्ता असलेल्या सोमेश्वर चा तर नाही हे बघण्यासाठी लोकांनी तेथे गर्दी केली.
यावेळी घटनास्थळी सावनेरचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोकासे मॅडम दाखल झाले. बातमी कळताच मदतीसाठी हितज्योती आधार फाउंडेशन चे हितेश बनसोड यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकासह येऊन विहिरीतील मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तपासणी केल्यानंतर तो सोमेश्वर कुडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सोमेश्वर ने बेपत्ता होताच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विहिरीत जाऊन उडी घेतल्याची चर्चा नागरिक करीत आहे.
यावेळी पोलिसांनी मृतदेह विहिरी बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेरच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही आत्महत्या की हत्या याची माहिती समोर येणार. पण घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. या घटनेचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे.