✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात वर्चस्वाचा लढाई साठी गँगवार सुरू झालेच समोर आल्याने कारागृह प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या दोन गुंडांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हाणामारी झाली असल्याची घटना समोर आलीय. त्यामुळे जेल प्रशासनाची झोपच उडाली आहे. विशेष म्हणजे याआधी मोबाईल, बॅटरी आणि गांजाही नागपूर मध्यवर्ती कारागृहात आढळून आला होता. या घटनेला फार दिवस उलटले नाहीत, तोच आता कारागृहात वाद झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर शंका घेतली जातेय.
काय आहे प्रकरण?
नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार अबू खानला मारहाण करण्यात आली. भुरु नावाच्या एका गुंडासोबत अबू खान याची बाचाबाची झाली. त्यानंतर अबू खान याला मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेनं कैद्यांमध्येही दहशत माजली आहे, तर जेल प्रशासनाचा कैद्यांवर कोणताही धाक उरलेला नसल्याचंही अधोरेखित झालंय.
अबू खान आणि भुरु हे दोन्हीही नागपुरातील खतरनाक गुंड म्हणून कुप्रसिद्ध आहेत. ते दोघंही सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतायत. अबू खान याने गुंड भुरु यांच्या घरातल्यांना टोमणा मारत डिवचलं. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून झालेल्या बाचाबाचीचं पुढे हाणामारीत रुपांतर झालं. भुरु याने अबू खान याला जबर मारहाण केली. जबर मारहाणीमध्ये अबू खान याला गंभीर जखम झाली. अबूच्या चेहऱ्याला, ओठाला आणि कंबरेला मार लागल्याची माहिती मिळतेय.
कारागृहात गँगवॉर?
अबू आणि भुरु यांच्यात कारागृहामध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरु असल्याचीही चर्चा आहे. हाणामारीच्या घटनेनंतर आता अबू याला फासी यार्डमध्ये स्थलांतरीत केलं जाण्याची शक्यता आहे. भुरु हा वसंतराव नाईक झोपडपट्टी कांडातला प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा आहे. तर अबू खान हा खंडणी वसूलीसाठी कुप्रसिद्ध आहे. जमिनींवर ताबा मिळण्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु होता. अखेर वादातून वणवा पेटून दोघांमध्ये जबर हाणामारी झालीय. जेलमध्ये गँगवॉरसारखी घटना घडल्यानं नागपूर जेल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही आता सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.