प्रशांत जगताप
हिंगणघाट:- दिवसेंदिवस विविध आजारांनी डोकेवर काढायला सुरुवात केलेली असून अनेक रुग्णालयातील रक्तपेढ्या या रिकाम्या असल्याने अनेक गरजू रुग्णांची हेळसांड होत असल्याचे पाहून प्रहारचे नेते रुग्णमित्र गजू कुबडे यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रहार कार्यकर्त्याच्या जन्मदिनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून या रक्तपेंढीला रक्त पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.या मुळे ग्रामीण भागातील गरजू गोरगरीब रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे गजू कुबडे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहारचे कार्यकर्ते पवन वाघमारे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि 13 सप्टेंबरला संतोषी माता मंदिर हिंगणघाट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन येथील माजी नगरसेवक ज्येष्ठ पंतजलीचे कार्यकर्ते श्री वसंतराव पाल गुरुजी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रहारचे शहर प्रमुख अतुल जाधव, अजय लढी, अमित गोजे,अजय ठाकरे, सूरज कुबडे हे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी कस्तुरबा हॉस्पिटल येथील चमू उपस्थित होती. या शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रहार तर्फे कार्यकर्त्यांचे जन्मदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरे करण्याची संकल्पना रुग्णमित्र गजू कुबडे यांनी कार्यकर्त्यात रुजविलेली आहे.यापूर्वी दि 2 सप्टेंबरला सावली (वाघ) येथे श्री अनता वायसे या कार्यकर्त्याने वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्यात आला होता. या प्रहारच्या उपक्रमामुळे अतिशय सकारात्मक प्रतिसाद जनतेतून मिळत आहे. रक्तदानाची कमतरता काही प्रमाणात दूर होत आहे.
या अनोख्या उपक्रमाबाबत बोलतांना रुग्णमित्र गजू कुबडे म्हणाले, मी रुग्णसेवेच्या निमित्तने अनेक रुग्णालयात जात असतो या सर्वच ठिकाणी रक्ताची कमतरता आढळून आलेली आहे.याचा त्रास गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना होतो. त्यामुळे ही गरज ओळखून कार्यकर्त्यांच्या जन्मदिनी रक्त दान शिबीर घेण्याबाबत कार्यकर्त्याशी विचार विनिमय केला व सर्व कार्यकर्त्यांनी सकरात्मक प्रतिसाद दिल्याने हा अभिनव उपक्रम राबविण्याचा मी निर्धार व्यक्त केला. कार्यकर्ते व जनतेच्या उदंड प्रतिसाद पाहाता यात आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे असे मत रुग्ण मित्र गजू कुबडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन परंडा ग्रा प सदस्य नितेश महाकाळकर यांनीं केले तर या शिबिराच्या आयोजना साठी शाखा प्रमुख महेश नरड, मनोज जिकार, सूरज कुबडे, धीरज नंदरे, पवन वाघमारे,अमोल रामुदंडे अमोल वाघमारे, अमित गोहणे, सौरभ लोणकर, दिनकर कुबडे, प्रवीण चरडे, रुपेश खडसे, प्रफुल धानोरकर, अमोल धानोरकर, भूषण डाखोरे,सूरज भोपळे, प्रवीण दरवेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.