पल्लवी मेश्राम उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मांजर चावल्याने एक 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उखळी गावात घडली आहे. श्रेयान्शू क्रिष्णा पेंदाम वय 11 वर्ष असे या मुलाचे नाव असून अचानक मुलाच्या मृत्यूने पेंदाम कुटुंबियांच्या दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
उखळी गावात श्रेयान्शू पेंदाम हा शनिवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत परिसरात खेळत होता. खेळत असताना एका मांजरीने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाचां चावा घेतला. चावा घेतल्यानंतर श्रेयान्शू घरी आला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला.
त्यानंतर काही वेळानंतर श्रेयान्शू याला मळमळ सुरू झाली आणि उलट्या होत होत्या. आई वडिलांनी त्याला तडकाफडकी लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तेथून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल, असे पोलिस अधिकारी यांनी सांगितले
ही अतिशय दुर्मीळ घटना..
मांजरीने चावा घेतल्याने मृत्यू होण्याची ही दुर्मीळ घटना आहे. मांजरीचा हल्ला आणि चावा घेतल्यानंतर श्रेयांशू घाबरला आणि त्याला उलट्या सुरू झाल्या. उलटी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा किंवा आणखी कोणत्या तरी विषारी श्वापदाने दंश केला असावा.
पायाला जखम होणे किरकोळ असले तरी महत्त्वाच्या अवयवाच्या रक्तवाहिनीला इजा झाल्याने मृत्यू होऊ शकतो. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे म्हणाले.