विविध प्रात्यक्षिकांमधून केले अंधश्रद्धा निर्मूलन. विज्ञानाची कास मानवी प्रगती हमखास.- प्रमोद जाधव
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 14 मार्च:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन विषयी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रमोद जाधव होते तर प्रमुख अतिथी म्हणून बालकुमार सोमलकर, मनोज अडगुलवार, दत्ता लांडे, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर बादल बेले यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास बावणे यांनी केले तर आभार बादल बेले यांनी मानले. यावेळी स्वयं अध्ययन परीक्षेत प्राथमिक विभाग गटातून प्रथम क्रमांक दिशांका पडवेकर वर्ग 7 वा, द्वितीय दिव्या पिंपळकर वर्ग 7 वा, तृतीय प्राप्ती पावडे वर्ग 6 वा तर हायस्कुल विभाग गटातून प्रथम मानसी बोबडे वर्ग 8 वा, द्वितीय गायत्री येरणे वर्ग 9 वा , तृतीय दीक्षा धोंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तकं व भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत टेबलवर ठेवायचे व भिंतीवर लावायचे अंधश्रद्धा संदर्भातील माहिती दिनदर्शिका शाळेला भेट म्हणून देण्यात आली.
यामध्ये अंधश्रद्धा या विषयावर आधारित अनेक जनजागृतीपर माहिती लिखाण चित्रसाहित आहेत. यावेळी हातावर कापूर जाळणे, दोरीच्या सापाला दूध पाजणे, स्पेलिंग कार्ड, दिनदर्शिका न बघता वाढदिवसाचा वार सांगणे, पाण्याने दिवा जाळणे, भूत काढण्याचे विविध प्रात्यक्षिक, लाकडी हुक बोटावर ठेवणे, अणकुचीदार लोखंडी खिळ्यांवर उभे राहणे अश्या विविध प्रकारच्या प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी प्रमोद जाधव यांनी विज्ञानाची कास प्रगती हमखास असे विद्यार्थ्यां सोबत चर्चेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील शंका कुशंका प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केला व त्यांच्या प्रशांचे समर्पक उत्तर प्रमोद जाधव यांनी दिले.