भगतसिंगांची फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून गांधींजींनी काय केले ?
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- विधीमंडळावरील बॉम्ब हल्ला आणि भगतसिंगांनी सँडर्सचा केलेला खून यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलेले होते. महात्मा गांधींनी आयर्विन यांच्यासोबत अनेकतास चर्चा केली. भगतसिंग आणि सहकाऱ्यांचा मृत्युदंड टाळण्याची विनंती केली. अनेकदा गांधींनी तो विषय काढला; पण आयर्विन त्यात हस्तक्षेप करायला सातत्याने नकार देत राहिले. गांधींच्या तगाद्याने शेवटी आयर्विन वैतागले होते. एकदा तर वैतागून आयर्विन यांनी गांधींना विचारले की, ‘हिंसक कृत्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची बाजू तुम्ही घेता तरी कसे?’ त्यावर गांधी आयर्विनला म्हणाले होते, ‘येथे हिंसा-अहिंसेचा मुद्दा कोठे येतो ? देशासाठी प्राण देण्याची तयारी असलेल्या हिमतवान, बहादूर लोकांसाठी मी प्रयत्न करतोय.’
ब्रिटिश सरकार भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी तयार झाले नाही याला अनेक कारणे होती. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंग यांनी पोलीस सुपरीटेंडन्ट सँडर्स याचा दि. २८ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरमध्येच गोळ्या घालून खून केल्याचा आरोप आधी त्यांच्यावर होताच, त्यात दि. ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि सहकाऱ्यांनी केंद्रीय विधीमंडळात प्रवेश करून त्यात दोन बॉम्ब टाकले; यावेळी तिथे सर्व ब्रिटिश सदस्य आणि सर जॉन सायमन हा अधिकारीसुद्धा हजर होता. या सर्वांनी ही घटना आपल्या डोळ्यांदेखत घडताना बघितली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या सर्वांना दि. २४ मार्च १९३१ रोजी फाशी देण्याचे ठरले होते; पण जनमताच्या रेट्यामुळे दि. २३ मार्च म्हणजे एक दिवस आधीच फाशी देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. हे जेव्हा गांधीजींना कळले तेव्हा त्यांनी पहाटे ६ वाजताच व्हॉइसरॉयला ट्रन्क कॉल केला तो वेळेवर पोहोचला; पण व्हॉइसरॉयच्या टेबलावर ठेवला गेला नाही. पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतातील जे इंग्रज आय.सी.एस. अधिकारी होते त्यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्ट शब्दांत कळवले की, ‘वरील लोकांची फाशी आपण टाळली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ.’ त्यामुळे फाशी टाळणे हे ब्रिटिश सरकारसाठी कठीण झाले होते. एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा गांधींनी भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेत सूट मिळवण्या साठी प्रयत्न केले. त्या तिघांना सोडवण्यासाठी ‘तिघांना फाशीऐवजी कमीत कमी शिक्षा द्यावी’ असे पत्र लिहून कळवले; परंतु ‘काही बाबतीत माझे हात बांधलेले आहेत’ असे म्हणत लॉर्ड आयर्विन यांनी तेव्हा महात्मा गांधींची विनंती धुडकावून लावली होती. हा निर्णय ब्रिटिश सरकारचा असल्याने लॉर्ड आयर्विन काहीच करू शकले नाहीत. लॉर्ड आयर्विन आपल्या आत्मचरित्रात स्वतः कबूल करतात की, ‘भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी टळावी म्हणून भारतातल्या एकाच माणसाने प्रयत्न केला आणि तो माणूस म्हणजे गांधी होते; पण मी काही करू शकलो नाही. माझे हात प्रशासनाने बांधलेले होते.’
स्वतः भगतसिंगांचे सहकारी प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ सन्याल यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्दल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे आणि गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकिकत सविस्तरपणे नोंदविली आहे. सन १९२१ ते १९४२ हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ‘ॲन इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात लिहिला गेला आहे त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘इट मस्ट बी ॲडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग’ अजून कुठला पुरावा हवाय? पण असा आरोप करणारे मात्र स्वतः काय केले? हे सांगत नाहीत. मजबुती का नाम गांधी हैं….!