राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड चा उपक्रम. स्वच्छता अभियान राबवून परिसरातील प्लास्टिक कचरा केला नगर परिषदेच्या स्वाधीन.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 24 मार्च:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील राजुरा तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कुल येथे राष्ट्रीय हरित सेना विभाग व स्काऊट गाईडच्या वतीने समाज व मानवातील दुर्गुणांचे दहन करीत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे अध्यक्ष सतीश धोटे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष मनोहरराव साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकरराव जाणवे, अविनाश निवलकर, मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या ऍड. मेघा धोटे, वर्गशिक्षक विकास बावणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पंधरा दिवस सातत्याने परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक व कागदी कचरा गोळा केला जातो. त्यातील प्लास्टिक कचरा नगर परिषदेला दिला जातो तर समाज व मानवातील दुर्गुण द्वेष, अहंकार, हिंसा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसन, कुपोषण, आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, हिंसाचार, वृक्षतोड, बालमजुरी, अज्ञान, प्रदूषण, प्लॅस्टिक वापर, असत्य अशा विविध प्रकारच्या पट्ट्या तयार करून या होळीत दहन केले जाते. यावेळी विद्यार्थ्यांनी शेणाच्या चकत्याच्या माळा, होळीच्या गीतांवर नृत्य व फेस पेंटिंग करून पाणी वाचवा, झाडे लावा… झाडे जगवा…., वाघ वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, प्लास्टिक वापर टाळावा असे संदेश देऊन सर्वांचे लक्ष वेधले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयश्री धोटे यांनी केले. तर प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. यावेळी राष्ट्रीय हरित सेना(इको क्लब), छ.शिवाजी महाराज स्काऊट युनिट, छ.संभाजी महाराज स्काऊट युनिट, राष्ट्रमाता जिजाऊ गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले तसेच नगर परिषदेच्यावतीने घंटागाडी मार्फत स्वच्छता अभियान राबवून गोळा केलेला प्लास्टिक कचरा किशोर वरवाडे यांनी संकलन करून सहकार्य केले.