नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आधीच देशात आणि राज्यात इव्हीएम विरोधात अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. त्यात यवतमाळ येते ‘इव्हीएम’ मशीन ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान प्रक्रिया घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो, असे पत्र प्रशासनास देणाऱ्या येथील अमोलकचंद महाविद्यालयातील प्राध्यापका विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
यवतमाळ येथील उपविभागीय अधिकारी व निवडणूक अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. प्रा. डॉ. सागर जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
डॉ. प्रा. सागर जाधव यांनी आपण ‘इव्हीएम’ मशिन ऐवजी मतपत्रिकेद्वारा निवडणूक प्रक्रिया घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत, असे पत्रच थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. हे पत्र समाज माध्यमांत सार्वत्रिक झाले. प्रा. डॉ. सागर जाधव यांनी हे पत्र समाज माध्यम तसेच बातमी प्रसिद्ध प्रसिद्ध करून निवडणूक कर्तव्यात असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिकामध्ये ‘इव्हीएम’ मशीन संदर्भांत संभ्रम निर्माण केला व निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे दिसून येते, अशी तक्रार अवधुतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबतची बातमी प्रसिध्द केली ही बाब अत्यंत बेजबाबदार व गैरकायदेशीर स्वरूपाची आहे. तसेच त्यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व अशोभनीय असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
‘इव्हीएम’ मशीन ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास जबाबदारी पार पाडू, असे गैरकायदेशीर व बेजबाबदार स्वरूपाचे मत व्यक्त केले, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून प्रा. डॉ. सागर जाधव यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे भादंवि कलम १३४ सहकलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.