हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार वेग आला आहे. मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. त्यात कुणी पदयात्रा काढून, तर कुणी घरोघरी प्रचार करतंय. पण यातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराने अजब आश्वासन मतदारांना दिले आहे. या महिला उमेदवाराने दिलेले आश्वासन ऐकून सर्वच अचंबित झाले आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उभ्या असलेल्या उमेदवार वनिता राऊत या अखिल भारतीय मानवतावादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्रपूरात मागील अनेक वर्ष दारुबंदी आहे. त्याचा फायदा घेत महिला उमेदवार वनिता राऊत यांनी प्रचारासाठी घेतला आहे. वनिता राऊत म्हणाल्या की, गाव तिथे बिअर बार, पिणाऱ्याकडे आणि विक्री करणाऱ्याकडे परवाना असायला हवा. कायदेशीर मार्गाने दारूविक्री झाली पाहिजे. अजून पर्यंत सरकारने त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे मला पुन्हा निवडणुकीत उभं राहायला लागलं असं त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, सरकार आनंदाचा शिधा वाटते, रेशन कार्डवर साड्याही मिळतात. जर चंद्रपूरच्या लोकांनी मला खासदार बनवलं तर आनंदाचा शिधासोबत व्हिस्की, बिअर जी काही उच्च दारू आहे. ती माझ्या खासदार निधीतून व्हिस्की, दारू देईन असं आश्वासन दिले आहे. २०१९ च्या चिमूर विधानसभा निवडणुकीवेळीही वनिता राऊत उभ्या होत्या. त्यावेळीही गाव तिथे बिअरबार असं आश्वासन त्यांनी लोकांना दिले होते. चंद्रपूरला शेजारील इतर जिल्ह्यात दारूबंदी नाही मग चंद्रपूरकरांनी काय केलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरकरांनी वनिता राऊत यांच्या आश्वासनाला फार दाद दिली नाही. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र पुन्हा एकदा वनिता राऊत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी लोकांना पुन्हा साद घातली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पार्टी महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्येही ही लढत होणार आहे.