अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परिक्षेत येथील भवन्स गिरधरदास विद्यामंदिरची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु.स्वरा संदीप मुडे हिने सर्वाधिक गुण घेत सुवर्णपदक पटकाविले. ती या स्पर्धेच्या शिष्यवृत्तीची मानकरी ठरली आहे. मुंबई येथे आयोजित बक्षीस समारंभात प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. प्रियदर्शनी कर्वे, कुलाबा वेधशाळा विभाग प्रमुख डॉ सुनील कांबळे, उदय देसाई यांच्या हस्ते कु.स्वराला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे १९८१ पासून डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा घेतली जाते. ज्यात महाराष्ट्र राज्यातून इयत्ता ६वी व ९वी चे सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा ४ टप्यात घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा, यातून साडेसात टक्के विध्यार्थी निवडून दुसऱ्या टप्प्यात त्यांची प्रयोग करण्याची क्षमता तपासली जाते, तिसऱ्या टप्प्यात चिकित्सक वृत्ती तपासण्यासाठी एक प्रकल्प सादर करावा लागतो. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची गोळाबेरीज करून चौथी व अंतिम टप्प्याची मुंबई येथे मुलाखत घेतल्या जाते. यंदा स्पर्धेसाठी फॅशन अँड इन्व्हायर्नमेंट हा विषय देण्यात आलेला होता. यात कु. स्वराने फॅशन इंडस्ट्रीज मुळे पर्यावरण व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेत सागवान वनस्पती आणि पळसाचे फुले यासारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करून लिपस्टिक ची निर्मिती केली. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे कंटेनर न वापरता बांबू, होममेड क्ले, जिलेटिन कॅप्सूल व पेपर कार्डबोर्ड चा वापर करित इकोफ्रेंडली बायोडिग्रेडीबल लिपस्टिक कंटेनर सुद्धा बनविले. तिचा या संशोधनाला परीक्षकांनी पसंती दिली.
यावेळी स्वराला भवन्स जीविएम च्या प्राचार्य धरती तमगिरे, विज्ञान शिक्षक कमलेश वर्मा, शिक्षिका ब्रिंदा यादव, नीला नागुलवार, गौरी म्हैसलकर, आई वडील डॉ.अपर्णा व डॉ. संदीप मुडे यांचे मार्गदर्शन लाभले.