संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- निसर्ग व पर्यावरणासाठी समर्पित आणि सामाजिक कार्यकर्ता अशी ख्याती असलेले, भारत सरकार चा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त व चंद्रपूर जिल्हाचा गौरव असलेले बंडू सितरामजी धोतरे यांनी देशाची राजकीय परिस्थिती बघता काँग्रेस पक्षाचे सदस्य होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे काँग्रेसचे बळ वाढणार असल्याचे मत व्यक्त करीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी श्री. धोतरे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले आहे.
भारत देश इतिहासाच्या एका निर्णायक टप्प्यावर आहे, अशा परिस्थितीत नैतिक आवाज व पद असलेला कोणताही व्यक्ती राजकीय व सामाजिक दृष्ट्या शांत आणि तटस्थ राहू शकत नाही, कारण देशाच्या आत्म्यालाच धोका आहे. सोबतच, देशात एकंदरीत फक्त भांडवलशाहीस पोषक असे वातावरण निर्माण करून जल, जंगल, जमीन व जन (जनतेच्या) हिताचा विचार न करता अव्याहतपणे नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास देशात सर्वत्र सुरू झाला असून, विकासाच्या नावाखाली निवडक आणि विशिष्ट उद्योगासाठी प्रयत्न केले जात असल्याचे चित्र आहे, असे श्री. धोतरे यांनी नमूद केले आहे. सोबतच, लोकशाहीत विरोधी पक्षाना अनन्यसाधारण महत्व असते. मात्र देशात व राज्यात सध्याचे राजकारण बघता देशातील लोकशाहीकरिता पोषक वातावरण राहील की नाही अशी शंका व्यक्त करित, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणाशी नाड जुडलेला उमदा समाजसेवक महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्य आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य व एक समर्पित कार्यकर्ता होण्याची इच्छा व्यक्त करणारे पत्र चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांना आज प्राप्त झाले आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी काँग्रेसच्या सामाजिक व राजकीय कार्यात अधिक सक्रीय होत काँग्रेस विचारसरणीत सामिल होऊन कॉँग्रेसच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल मी त्यांचे चंद्रपूर जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षात हार्दिक हार्दिक स्वागत करतो व भविष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे.