पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येऊन कुख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या कुख्यात गुन्हेगाराची मित्रानेच दगडाने ठेचून हत्या केली आहे. ही थरारक घटना शनिवारी पहाटे 5 वाजता कळमना येथे उघडकीस आली. चंदनसिंह प्रमोद बंशकार वय 26 वर्ष रा. सूर्यनगर असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे तर संतोष ऊर्फ भाचा जितलाल पटीला वय 20 वर्ष, मिनीमाता नगर असे आरोपीचे नाव आहे. कळमना येथे राहणाऱ्या मृतक चंदनसिंह बंशकार याच्यावर विविध पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी भाचा पटीला हा सुद्धा गुन्हेगार आहे. दोघेही ‘वॉंटेड’ आहेत.
मृतक चंदनसिंह याच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच त्याने जबलपूरच्या एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला पळवून नागपुरात आणले. त्यामुळे चिडलेल्या वडिलाने त्याला घरातून हाकलून दिले. तो आपल्या प्रेमिके बरोबर भाड्याने खोली करून राहत होता. त्याला चोरी-घरफोडी करण्याची सवय होती. तसेच त्याला दारुचे व्यसन होते. त्याची भाचा पटीला या गुन्हेगारा सोबत मैत्री होती. दोघेही नेहमी सोबत दारु पीत होते.
शुक्रवारी सायंकाळी चंदन आणि भाचा यांच्या वाद झाला आणि हाणामारी झाली. त्यामुळे चंदन किरकोळ जखमी झाला आणि पळून गेला. मात्र, भाचाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. चंदन हा घरी गेला. त्यावेळी त्याचे वडील घरी होते. चंदनच्या डोक्याला जखम बघून वडिलांनी विचारणा केली. ‘भाचा पटीलाने मारहाण केली. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी लपून बसलो’ असे सांगितले. वडिलांना १०० रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे दिले परंतु आज रात्रभर घरी थांब, असे सूचवले. मात्र, त्याने वडिलाचे न ऐकता तो घरातून निघून गेला.
चंदन हा कुकरेजा शाळेच्या मागे लपून बसल्याची माहिती आरोपी भाचा पटीला याला मिळाली. त्याने पहाटे 5 वाजताचा सुमारास चंदनला पकडले. काचेच्या बाटलीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर दगडाने ठेचून हत्या केली. सकाळी एका खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक ताणाजी गव्हाने यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी चंदनला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून भाचा पटीला याला दोन तासांत अटक केली.