महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पटणा:- येथील शाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दियारा येथील मकसूदपूर गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसविण्या वरून झालेल्या वादात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसविण्या वरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आल्याची माहिती शाहपूर मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांनी दोन गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी दानापूर उपविभागीय रुग्णालयात पाठवला असून पोलिसांनी चार संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात प्रामुख्याने चार जणांची नावे समोर येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल 2024 गावातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी केल्यानंतर काही नागरिकांनी परिसरातील शाळेजवळील सरकारी जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसण्याचा प्रस्ताव दिला. यावेळी गावातील काही नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तीन दिवस शांततेचे गेले. मात्र, त्यानंतर रात्रीच्या वेळेस दोन्ही गटाकडून हाणामारी, दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.
त्यानंतर या हिंसाचारात एका गटाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विक्रम कुमार वय 19 वर्ष या दलित तरुणाच्या चेहऱ्यावर एक गोळी लागली. तर उदय कुमार वय 24 वर्ष याच्या डोक्याला दगड लागल्याने जखम झाली. या दोघां जखमींना दानापूरच्या उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, गोळी लागलेला विक्रम कुमार याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. तर उदयला पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर विक्रमचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.