राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहे. राज्यात आघाडीत अजूनही काही मतभेद दिसून येते आहे. त्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं, यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या स्टेटमेंटला फार व्हॅल्यू देऊ नका, असं नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोलेंच्या या टोल्यावर आता संजय राऊतांनीही पलटवार केला आहे. तुम्हाला मिरची लागण्याचं कारण नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘हा पंतप्रधानपदाचा वाद नाही. आम्ही काय बोलतोय हे काँग्रेसला समजत नाहीये. राहुल गांधी देशाचे नेते आहेत. जर राहुल गांधींना बनायचं असेल तर त्याचं स्वागत आहे. पण देशात अजूनही चेहेरे आहेत. ममताजी आहेत, अखिलेश आहेत, उद्धव ठाकरे आहेत. आणखी बरेच चेहरे आहेत. खरगे आहेत. कुणाचं नाव घेणं गुन्हा आहे का? आमच्या पक्षाच्या नेत्याचं नाव आम्ही घेतलं, तर त्यात चूक काय? कुणाला एवढी मिरची लागण्याचं कारण नाही’, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं.
संजय राऊत काय म्हणाले ? ‘आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो, कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे शरद पवारांसारखा नेता, त्यांचं कतृत्व असतानाही त्यांना संधी मिळाली नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं. उद्धव ठाकरेंना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरेंना पसंती देतील. एक उमदा चेहरा आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आहे. कोरोना काळात एक राज्य सांभाळलं आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका आहे. या देशाला आज अशा सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे’, असं संजय राऊत म्हणाले होते.
नाना पटोलेंचा राऊतांवर निशाणा: ‘संजय राऊत रोज आपली स्टेटमेंट बदलतात, त्यामुळे संजय राऊतांच्या स्टेटमेंटला फार काही व्हॅल्यू देऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना प्रधानमंत्री बनवायला निघाले, आज त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत, त्यामुळे याच्यावर फार लक्ष घालू नका. संजय राऊतांनीही अशाप्रकारचं वक्तव्य करू नये’, असा इशाराच नाना पटोलेंनी दिला.