उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहे त्यामुळे आचार संहिता लागू आहे. पण चक्क एसटी राज्य परिवहन वाशिम आगारा कडुन लोकसभा निवडणुक आचार संहितेचा भंग करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एसटी च्या राज्य परिवहन विभाग वाशिम आगार व्यवस्थापक आणि प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने संपूर्ण राज्यभर निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. सर्वच पक्षाचे व उमेदवारांचे बॅनर फोटो सर्व सार्वजनिक ठिकाणाहून काढण्यात आलेले आहेत. परंतु राज्य परिवहन महामंडळाचे अकोला विभागातील वाशिम आगार याला अपवाद ठरले आहे. आचार संहितेचा काळात वाशिम आगाराच्या MH 07-C-9489 या बसवर तसेच आगारातील इतर काही बसवर सुद्धा महायुतीचे बॅनर लावुन प्राचार सुरु असल्याचे दिसुन आले. त्यामुळे आदर्श आचार संहितेला रापम परिवहन विभागाने काळे फासले आहे.
यावेळी बस वर सत्ताधारी नेत्याचा फोटो झळकत असल्याने काही जागरूक नागरीकानी सदर बसचा फोटो काढुन व्हायरल केल्या नंतर एस टी महामंडळाला जाग आली असून रात्री उशिरा गाड्यांवरील पोस्टर काढण्यात आल्याचे खात्रीलायक सुत्राकडुन समजले आहे. व या सर्व प्रकाराला विभागीय कार्यालय अकोला येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुक संमती असल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित जबाबदार अधिकार्यांवर काय कार्यवाही केली जाईल असा प्रश्न नागरीकांकडून विचारला जात आहे.