प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक आहेत. तसेच ते माजी मंत्री देखील आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरु असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्यभर फिरत आहे. अशात त्यांच्यावर आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियमांनुसार, स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून 48 तास आधी जाण्याच्या सुचना असतानाही अनिल देशमुख यांनी शुक्रवारी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली. दुपारी साडेचार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील नागरिकांची भेट घेतली होती.
बंदी असतांनाही स्टार प्रचारक मतदारसंघात असल्याने आचरसंहितेचं उल्लंघन झाल्याचे म्हणत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाटचे विस्तार अधिकारी सुभाष टाकळे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, अनिल देशमुख यांच्यावर आदर्श आचारसहितेचे भांदवि 1860 अन्वये कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल देशमुख हे महाविकास आघाडीच्या पवार गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. यासह ते वर्ध्याचे उमेदवार अमर काळे यांचे सख्खे मामा देखील आहे. अमर काळे यांच्या प्रचाराची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर आहे. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी हिंगणघाट येथे जात तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आचारसंहितेच उल्लंघन केल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.