अनिल कडू, विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू आहे. वाळू तस्कर अवैध वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचवत असून शासनाचा महसूल पण बुडवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात अवैध रेती तस्करी संबंधात प्रशासन कारवाई करीत असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील रेतीमाफियांची हिंगणघाट येथून रेती तस्करी करत असल्याने त्यांना समर्थन करणारे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी कोण अशा प्रश्न आज नागरिक उपस्थित करत आहे.
परिविक्षाधीन आयपीएस पोलीस अधिकारी तथा हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या प्रभारी ठाणेदार वृष्टि जैन यांचे पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यात दि. 2 मे रोजी हिंगणघाट पोलीसांनी मोठी कारवाई करीत रेती तस्करी करताना 5 मोठे टिप्पर ताब्यात घेतले. त्यामुळे रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या तस्कराचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
आज हिंगणघाट पोलिसांच्या प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नजीकच्या वर्धा मार्गावरील कवडघाट शिवारात अवैध रेती वाहतूक करताना आज 5 मोठी वाहने अवैध रेती साठ्यासह पकडली. जवळ्पास 52 ब्रास रेती या कारवाईत जप्त करण्यात आली असून 4 टीप्परसह एक 16 चाकी ट्रकसुद्धा पोलीसांनी ताब्यात घेतला. सदर कारवाईत रेतीसाठयासह तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली. ही सर्व वाहने अमरावती जिल्ह्यातील रेतीमाफियांची असल्याचे दिसून येत असून तालुक्यातील रेतीघाटांवरुन ही चोरटी वाहतूक करतांना स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याची चर्चा आहे.
सदर रेतीसाठा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हिंगणघाट पोलिस उपनिरीक्षक लक्षीकांत दुर्गे, पोलिस कर्मचारी प्रविण देशमुख, सुनील माथनकर, नरेंद्र आरेकर, विजय हारनूर, जफर शेख, नितीन ताराचंदि, सुनील मेंढे यांनी कारवाई केली असून तपास अधिकारी भारत वर्मा पुढील तपास करीत आहे.