अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून एका विकृत मानसिकतेच्या अज्ञात आरोपीने घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनीवारी दुपारी उघडकिस आली. सदर घटना स्थानिक संत ज्ञानेश्र्वर वार्ड येथे अमित जोगे यांच्या राहत्या घरी घडली असून यात जोगे यांचे जवळ्पास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अमित जोगे हे वाहतूक व्यवसायी आहेत. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे घरातून मोठया प्रमाणात धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी जोगे यांना फोनवरुन माहिती दिली. अमित जोगे हे येथे एकटेच राहतात. आज सकाळी काही कामानिमित्त ते वर्धा येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच ते आपल्या बाहेर गावी राहणाऱ्या आई व बहिणीसह परत आले. या दरम्यान शेजाऱ्यांनी प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
या घटनेची पोलिसांना माहिती कळविताच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी तथा प्रभारी ठाणेदार श्रीमती वृष्टी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता ही आग मुद्दाम लावली असल्याचा संशय घरमालक अमित जोगे यांनी व्यक्त केला. आग लावणाऱ्या अज्ञात आरोपीने बेडरूम मधील लाकडी बेड, गाद्या, आंथरून, कपडे, टीवी यांना आग लावीत, घरातील गॅस सिलेंडरपर्यंत आग लागुन मोठा स्फोट व्हावा, या वाईट हेतूने घरातील खिडक्या व दारांचे परदे गॅस सिलिंडरपर्यंत पसरवून ठेवले.
शेजाऱ्यांनी आग विझविण्याचे वेळी गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री एल.डी.दुर्गे व त्यांचे सहकारी पो.हवा. मुकेश येले तपास करीत आहे.