गरिबांच्या भूखंडाचे श्रीखंड लाटणाऱ्या राकाँ नेत्यांच्या बारामतीच्या चौकशीची करा युवा मोर्चाने निवेदनातून जिल्हा प्रशासनाकडे मागणी.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील काही काळापासून शहरात व हिंगणघाट महसूल उपविभागात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे. नियमबाह्य भुखंड विक्री, अवैध दारू, अंमली पदार्थ, मटका, जुगारासारखे व्यवसाय फोफावल्याचे दिसून येत असून यात राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने व स्थानिक नेत्यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करीत भाजयुमो या विरोधात एल्गार पुकारला.
भाजपा युवा मोर्चा द्वारे स्थानिक उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तसेच परिविक्षाधीन आयपीएस पोलिस अधिकारी श्रीमती वृष्टी जैन यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
या संबंधात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
अवैध भूखंड व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची माया जमविण्याच्या हेतूने जनतेच्या विश्वासाला छेद देऊन एन.ए.टी.पी मंजूर नसलेल्या व ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण होते अशा बारामती ले-आऊट, महाकाली नगरी व हिंगणघाट नदी लगतच्या परिसरातील अनेक लेआऊट उभरले. या लेआउट मधे ०३ वर्षापुर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तत्कालीन निर्माणाधीन असलेल्या बारामती नगरीत मोठ्या प्रमाणात पुढील ०१ ते ०२ महिन्यापर्यंत पाणी साचले असल्याने तेथील प्लॉट धारकांच्या मनांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी लेआऊट मालकाकडे भुखंड परत घेण्याची विनंती केली असता त्याना या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी सदर प्लॉट धारकांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जमा केलेली रक्कम परत पाहिजे असल्यास दिलेल्या रकमेतून ४०% पैसे कपात करुन रक्कम परत मिळेल असे धमकावल्याने प्लाट घेतलेल्या लोकांनी पैश्यावर पाणी फेरले या विवंचनेत त्यांनी आपले भुखंड तसेच ठेवले.
उपरोक्त भुखंडधारकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषीत तथाकथित नेत्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व मुंबईतील नेत्यांचा धाक दाखवून रेड झोनमध्ये असलेल्या जमिनीवरती अवैधरित्या लेआऊट निर्माण केले. नागरिकांना खोटेनाटे आश्वासन देऊन व लेआऊट निर्मितीसाठी लागणाऱ्या नियमांची अंमलबजावणी न करता जमिनी विकण्याचा गोरखधंदा हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात सुरुच ठेवला.
याचं धर्तीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध रेती तस्करीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना हाताशी धरून वणा नदीच्या पात्रात असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव-हिंगणघाट तालुक्यातील दारोडा, शेकापूर, सावंगी, सास्ती, कात्री घाटातून जेसीबी व पोकलेनच्या माध्यमातून वाळूचा अवैध उपसा करून टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाहतूक करून विक्री केल्या जात असल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे. असे असूनसुद्धा महसूल प्रशासन काहीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच दारू, गांजा विक्री, एमडी सारख्या अमली पदार्थाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शाळकरी विद्यार्थी व सामान्य नागरिक, युवा पिढी व्यसनाधीन झाल्याचे निदर्शनास येत आहे.
हिंगणघाट ते जाम मार्गावरील एक हॉटेल व्यवसायिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात दारु, गांजा व अमली पदार्थांची विक्री सुद्धा राजरोसपणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तरुणवर्ग व्यसनाधीन झाल्याचे निदर्शनास येत आहे आणि कित्येक कष्टकरी कुटुंबीयांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आर्थिक फायदा करून देण्याच्या उद्देशाने नेत्यांनी कार्यकर्त्यांना अवैध व्यवसाय राजरोसपणे करण्यासाठी परवानगी दिल्याने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे नेतेच कार्यकर्त्यांशी भागीदारी करून हे सर्व अवैध व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र प्रशासन सदर अवैध व्यवसायावर कुठलीही कठोर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. यावर येत्या 5 दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सोनू पांडे, शहर महामंत्री तुषार हवाइकर, महामंत्री तुषार येनोरकर, भुषण आष्टणकर, शहर उपाध्यक्ष मयूर येसनसुरे, स्वप्नील सुरकार, आशिष खिळेकर, ओम भोमले, सुरज काटकर, शंकर मोरे, रोहित हांडे, युवराज माउसकर, रितीक दांडेकर, बाबू रमिझ, नितीन नांद, सचिन मोरे, कुणाल रघाटाटे, योगेश जिकार, भूषण देहाडराय, सागर शेंडे, दिनेश खियानी, अमित कामडी, तेजस मुन, गणेश मस्के, हर्षद गिरडकर, सुजल नारनवरे, अनिकेत डबले, साहिल शेंडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.