✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी मागील हंगाम खूपच वाईट ठरला. सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्ले ऑफ पर्यंतही पोहोचले नाहीत. यामुळेच आता मुंबई इंडियन्स हा संघ आगामी हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. यासाठी तयारी सुरु झाली असून संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणाही करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी यष्टीरक्षक मार्क बाउचर आता मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. नुकतंच बाउचर यांनी टी२० विश्वचषक स्पर्धा २०२२ नंतर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर बाउचर महेला जयवर्धने यांची जागा घेतील. संघाने महेला जयवर्धने यांची नियुक्ती जागतिक कामगिरी प्रमुख म्हणून केली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी मार्क बाउचर यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. बाउचर आपल्या कौशल्यांचा मदतीने एक उत्तम प्रशिक्षक म्हणून संघाला विजयासाठी योग्य मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर ते मुंबई इंडिअन्सचा वारसा पुढे नेण्यास मदत करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर मार्क बाउचर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होणे ही सन्मानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे. फ्रँचायझी म्हणून त्यांचा इतिहास आणि कामगिरीने त्यांना जगातील सर्व खेळांमधील सर्वात यशस्वी स्पोर्ट्स फ्रँचायझींपैकी एक म्हणून स्पष्टपणे स्थापित केले आहे. म्हणूनच मी या नवीन आव्हानासाठी तत्पर आहे.’
दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक म्हणून बाउचर यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. २०१९ साली त्यांनी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत संघने दहा टेस्ट मॅचमध्ये विजय प्राप्त केला आहे. हा संघ सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही, बाउचर यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत संघाने आतापर्यंत १२ एकदिवसीय आणि २३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.