प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 31:- जिल्हा कोषागाराच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्ती विषयक इतर लाभ देण्यात येतात. लाभ देतांना कोणत्याही प्रकारे वसुली बाबत किंवा रक्कमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोनव्दारे संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याबाबत सूचित करण्यात येत नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यामुळे कोणत्याही प्रलंबित कामासाठी निवृत्तीवेतन धारकांनी ऑनलाईन रक्कम भरू नये, असे आवाहन कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
कोषागारामार्फत कोणत्याही निवृत्तीवेतन धारकांना फोनव्दारे कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगून ऑनलाईन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रक्कम भरण्याबाबत कळविले जात नाही. तसेच कोषागार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यास देखील निवृत्तीवेतन धारकांच्या घरी पाठविण्यात येत नाही. त्यामुळे अशा दुरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. कोणताही दुरध्वनी संदेश प्राप्त झाल्यास प्रथम कोषागार कार्यालयाला कळवावे तसेच काही शंका असल्यास कोषागार कार्यालयाशी सपंर्क साधावा, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे.

