प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 31:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार वर्धा न्यायिक जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय जे. भारुका यांनी वर्धा जिल्हा कारागृह वर्ग 1 ला भेट देऊन कारागृहाची पाहणी केली.
यावेळी जिल्हा न्यायधीश 3 विजय पी. आदोने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक डी. देशमुख तसेच लोक अभिरक्षक कार्यालय वर्धा चे मुख्य लोक अभिरक्षक सुशांत पी. काशीकर यांच्यासह सर्व लोक अभिरक्षक, जिल्हा कारागृह अधिक्षक सुहास पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षिरसागर यांची उपस्थिती होती.
यावेळी कारागृह भेटी दरम्यान श्री. भारुका यांनी कैदी बांधवांना उपलब्ध सोयीसुविधा याबाबत पाहणी करतांना कारागृहातील स्वच्छता, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, केंद्र व राज्य शासनाव्दारे वेळोवेळी देण्यात येणारे सुचनाचे पालन, जेवनाची सुविधा, पायाभुत सुविधा, व्यावसायिक प्रशिक्षण, सांस्कृतिक व मनोरंजनाची क्रिया, कारागृहात कैदी बांधवानी दिलेल्या सेवेचा वेळोवेळी मोबदला, कैदी बांधवाच्या तक्रारी, कारागृहातील बंद्याची संख्या, खुले कारागृह, ग्रंथालय सुविधा, साक्षरता शिक्षण, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा, सी.सी.टीव्ही कॅमेरा, 4 जी नेटवर्क जामर, कारागृहातील मंजुर व रिक्त पदे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणव्दारे वेळोवेळी कारागृहातील कैद्यामध्ये जनजागृती व नियमित भेटीबाबत, कारागृह विधी सहाय्य केंद्र अशा अनेक गोष्टीची पाहणी केली.
या सर्व सुविधा वेळोवेळी योग्यरित्या मिळाव्यात याकरीता संजय भारुका यांनी संबंधीतांना निर्देश दिले. तसेच आर्थिकरित्या कमकुवत असलेल्या बंदी बांधवांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने स्थापन केलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाव्दारे देण्यात येणारे मोफत कायदेविषयक सल्ला व सेवांचा वापर करुन घेण्याचे आवाहन केले.