अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- गायत्री परिवार सावनेर आणि गायत्री परिवार सौसर यांचे व्दारे अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार यांच्या तत्वज्ञानातुन शहरातील कै राम गणेश गडकरी नाट्यगृह सावनेर येथे ५ जून २०२४ ते १४ जून २०२४ या कालावधीत दहा दिवसीय भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सावनेर शहरात गायत्री परिवारातर्फे आयोजित या दहा दिवसीय भव्य पुस्तक मेळाव्यात गायत्री परिवाराचे संस्थापक परमपूज्य गुरुदेव पंडित श्री राम शर्मा आचार्यजी यांनी लिहिलेली सुमारे तीन हजार दोनशे पुस्तके उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच, प्रत्येक वयोगटातील व धर्मासाठी एकाच ठिकाणी जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या या संधीचा लाभ सहपरिवार सहकुटुंब घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
सध्या पुस्तकांच्या अभ्यासाची आवड कमी होत आहे, विशेषत: पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त साहित्य, धार्मिक वाचनात अधिकांश लोकात रस दिसुन येत नाही. बहुतेक लोक आपला वेळ फक्त मोबाईलवर घालवत आहेत. अशा स्थितीत लहान मुले आणि तरुण योग्य दिशेपासुन भटकुन जाण्याची भीती नेहमीच असते. अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त व इतर प्रसंगी साहित्यिक व अध्यात्मिक पुस्तके भेट देणे आणि पुरस्कार स्वरूपात ही पुस्तके प्रदान करणे ही चांगल्या परंपरेची नांदी ठरू शकते. असा आयोजकांचा ठाम विश्वास आहे.
या दहा दिवसीय भव्य पुस्तक मेळाव्यातून सामाजिक सदाचार, संस्कार व सदज्ञान आदी मुल्यांचे राखन व्हावे याकरीता पुस्तक मेळाव्याचे मुख्य आयोजक सौसर गायत्री परिवाराच्या वैशाली निमकर, सावनेर गायत्री परिवाराचे प्रा. कमल भारद्वाज, दिगंबर मांगले, मीनाक्षी भारद्वाज, सौसर गायत्री परिवाराचे ज्ञानेश्वर काळे, प्रमिला लाटकर, उषा पाटील, निशा काळे आदी परिश्रम घेत आहेत.