यूवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील लोणारा गावातील एका 21 वर्षीय तरुणीला परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास आली असता आरोपींनी जबरदस्तीने या तरुणीला कार मधून अपहरण करत तिला पळवल्याची घटनेने संपूर्ण कळमेश्वर तालुका हादरला आहे. ती तरुणी इंदिरा गांधी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास घरून निघाली होती यावेळी ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर येथे असलेल्या केझेएस महाविद्यालयात बीएससी अंतिम वर्षाला पीडित तरुणी शिक्षण घेत असून ती तालुक्यातील लोणारा येथील रहिवासी आहे. ही तरूणी 31 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास कळमेश्वरातील इंदिरा गांधी महाविद्यालय येथे बीएससी अंतिम वर्षाला परीक्षेकरिता आली होती. यावेळी तेथील समोरील टी पॉईंटवर आरोपींनी जबरदस्तीने तरुणीला कारमध्ये कोंडून लिंगा लाडाई येथील जंगलात नेले. ‘तू माझ्याशी लग्न कर’ म्हणत दोन दिवस तिथे कोंडून ठेवले. परंतु तरुणीने नकार देत 2 जून रोजी आरोपीच्या तावडीतून कसीबशी सुटका केली व घर गाठले. यावेळी सर्व हकीकत आपल्या पालकांना सांगितली.
यावेळी पालकांनी तरुणीला घेऊन तत्काळ कळमेश्वर पोलिस स्टेशन गाठून आपली तक्रार दाखल केली. आरोपी गणेश ध्यानेश्वर डेहनकर वय 26 वर्ष, रा. लोणारा, रवी दिगंबर डेहनकर वय 26 वर्ष संकेत नंदू डेहनकर वय 22 वर्ष, रा. लोणारा यांना कळमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपींनी तरुणीच्या अपहरणासाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहॆ . आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.