उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात कुठेही यश मिळाले नाही. खुद्द प्रकाश आंबेडकर यांना देखील दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक रिंगणात होते. वंचितला आलेले अपयश याची दखल देत प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अकोल्यात तिरंगी लढत होईल असे अपेक्षित असताना भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी चांगली आघाडी घेत विजय मिळवला. इथून काँग्रेसच्या तिकिटावर अभय पाटील मैदानात होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली, जनतेचा जनादेश स्वीकारतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीचा पराभव केला.
तसेच आमचा पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू. याशिवाय आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू. वंचित बहुजन आघाडी विजय असो, असेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.