महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- काल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकाचे निकाल जाहीर झाले त्यात युपी येथील नगिना लोकसभा मतदारसंघातून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा विजय झाला आहे. त्यामुळी देशात दलित आणि आंबेडकरी आंदोलन व चळवळीचा भीम आर्मीचा आवाज आता संसदेत घुमणार आहे.
नगिना लोकसभा मतदारसंघातून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना 512552 मतं मिळाली आहेत, त्यांनी या जागेवर 151473 मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार ओम कुमार यांना 361079 मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला 102374 मतं मिळाली आहेत. बसपचे उमेदवार सुरेंद्र पाल यांना 13272 मतं मिळाली.
उत्तर प्रदेश व देशात दलित राजकारणातील प्रमुख चेहरे आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी नगिना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना सुरुवातीपासून चांगली आघाडी घेतली होती. यूपीमध्ये बहुजन समाज पार्टीला पर्याय म्हणून भीम आर्मी उत्तर प्रदेशात हातपाय पसरु पाहात आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या विजयामुळे भीम आर्मीच्या आशा पल्लवित होणार आहेत. आझाद समाज पार्टीचे चिन्ह गायीगुरे आहे.
37 वर्षीय आझाद हे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जातात. उत्तर प्रदेशसह देशामध्ये त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. चंद्रशेखर आझाद यांनी भाजपच्या ओम कुमार यांचा पराभव केला आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने देखील या ठिकाणी उमेदवार दिले होते. आझाद हे त्यांच्या पक्षामार्फत निवडणूक लढवणारे एकमेव उमेदवार होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण, त्यांना फक्त 4501 मतं मिळाली होती. त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं.