युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. त्यात राज्यात भाजपा प्रणित महायुती आणि काँग्रेस शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने खासदारकी मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने बाजी लावली. मात्र फोडाफोडी, पक्ष बदलणे हे मतदार राजांना पटलेलं नसल्याचं कालच्या निकालातून दिसून आले आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या आमदार पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या राजू पारवे यांना देखील दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी मिळाली होती. या जागेसाठी राजू पारवे देखील इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटातून रामटेकसाठी पारवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अशात लोकसभेच्या या लढाईत मतदार राजाने काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वें यांना प्रचंड बहुमताने विजय केले. या लोकसभा निवडणुकीत राजू पारवे यांना 5 लाख 36 हजार 257 मतं मिळाली. तर श्यामकुमार बर्वे यांना 6 लाख 13 हजार 25 मतं मिळाली आहेत. 76,767 मतांनी बर्वेंनी पारवेंचा पराभव केला आहे.
काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश करताना पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. महायुतीकडून राजू पारवे यांना उमेदवारी मिळाल्या नंतर पंतप्रधान मोदींनी देखील प्रचारसभा घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी रामटेकमध्ये दाखल झाले होते. मात्र तरीही राजू पारवे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आमदारकी सोडली आणि खासदारकीही गेली अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे.