पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एका कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली आहे. नागपूर- अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहा 6 कामगाराचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर कंपनीचे व्यवस्थापक आणि मालक फरार झाले आहेत.
या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर-अमरावती मार्ग रोखून धरला होता. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे, त्यात काही नागरिकांनी सांगितले की, या कंपनीत स्फोटाच्या वेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या. सुमारे 500 किलो स्फोटके व वातींमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेच त्यांना जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काय आहे ही घटना. चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनी 22 एकरांत पसरली असून या कंपनीत बारूद व फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी अचानक भीषण स्फोट झाला.
मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर अवस्थेत विव्हळणाऱ्या जखमींसाठी गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते. मात्र, प्रशासन थंड होते. दीड तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली. अग्निशमन दलाचे बंबही पोहोचले. तोपर्यंत चार ते पाचजणांचा मृत्यू झाला होता. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी शीतल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या भीषण स्फोटाच कारण अस्पष्ट: प्रामुख्याने या कंपनीत फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते. त्यासाठी परिसरातील तरुण व महिला कामावर होते. पॅकिंग युनिटमध्ये स्फोटके ठेवून वाती तयार केल्या जात होत्या. गुरुवारी 9 कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व पूर्ण स्फोटके, वातींनी क्षणार्धात पेट घेतला. स्फोटाची तीव्रता माेठी होती व त्यामुळे कामगारांना हलण्यासदेखील वेळ मिळाला नाही.
गांवकरी व कामगाराचा रोषाचा भडका : या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला. त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली. घटनास्थळी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला.