आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मागील काही दिवसांपासून पर राज्यातून मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी होत आहे. त्यामुळे जिल्हात तरुण आणि नागरिकात मोठ्या प्रमाणात नशाखोरी वाढल्याचे चित्र दिसून येते आहे. पण पोलिसांनी धडक कारवाई करत गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल 102 किलो गांजा जप्त केल्याने गांजा तस्करात एकच खळबळ उडाली आहे.
उडीसा येथून वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी होत असल्याची माहिती वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गिरड परिसरात सपळा रचून तब्बल 102 किलो गांजा जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या असून दोघेजण फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने या तस्करीचा भांडाफोड केल्याने पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी गुन्हे शाखेला 50 हजाराचे बक्षीस जाहीर केले.
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना कारवाईचे आदेश दिले होते. माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक तैनात करण्यात आले होते. अशातच वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील रहिवासी सुरज वासेकर हा उडीसा येथून मोठ्या प्रमाणात गांजा वर्धा जिल्हात घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गिरड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची चार पथक तैनात करून वाहनाला ताब्यात घेण्यासाठी सहा टॅक्टरांची मदत घेतली. संशयित कार दिसताच पोलिसांनी कारला अडवत तपास केला असता यात 102 किलो गांजा आढळला. पोलिसांनी कारचालक सुरज वासेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता हिंगणघाट येथील आशिष हाडके व सेवाग्राम येथील अस्मित भगत यांचाही या गुन्ह्यात सहभाग आढळला आहे.