युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापासून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशाची अंमलबजावणी न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कन्हान नदीत टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दूषित झाल्याने नागपुरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने नदी नाले प्रवाहित झाले आहे. त्यात कन्हान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. 1 जुलैच्या दुपारी कन्हान जल शुद्धीकरण केंद्राच्या (डब्लूटीपी) जलवसाहतीच्या विहिरीजवळ नदीत ओसीडब्लू कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख पडलेली आढळली. त्यामुळे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तात्काळ खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत टाकण्यात आल्याची माहिती वरिष्ठांना दिली.
दरम्यान अधिकाऱ्यांकडून या राखेचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेतले गेले. त्यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव राखेच्या तलाव आणि वारेगाव येथील खासगी राखेपासून तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्रासाठीच्या राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
या राखेमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बघत तातडीने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबवण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली. त्यात राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित होऊन गंभीर धोके संभावित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
सोबत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ओसीडब्लूकडूनही कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरातही आवश्यक उपाय करण्याचे कामही हाती घेतले गेले. खबरदारी म्हणून राख आढळलेल्या जलवसाहत परिसरातील विहिरीचे पंपही थांबवण्यात आले. त्यामुळे तुर्तास कन्हान नदीतून नागरिकांना केवळ पिण्यायोग्यच पाणी मिळत आहे. सोबत येथील पाण्याची तपासणीही केली जात असल्याचे ओसीडब्लूच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे.
कन्हान जल शुद्धीकरण केंद्र २५ टक्के क्षमतेवरच सुरू: औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सध्या त्याच्या मूळ क्षमतेच्या दोन तृतीयांश क्षमतेनेच कार्यरत आहे. या अर्धवट पंपिंगमुळे आशी नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन आणि नेहरू नगर झोनचा समावेश असलेल्या कन्हान फीडरच्या मुख्य भागातून पुरवल्या जाणाऱ्या कमांड एरियामध्ये राहणाऱ्या ग्राहकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याचे ओसीडब्लूचे म्हणणे आहे. आवश्यक दुरुस्ती व उपायानंतर हा पुरवठा पूर्ववत होणार असल्याचेही ओसीडब्लूचे म्हणणे आहे.