मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहे. सदर महाविद्यालय हे उपजिल्हा रुग्णालयातच व्हावे अशा मागणीचे निवेदन प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज वैद्धकीय आरोग्य मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे खासगी सचिव आर. एन. पाटील यांना सुपूर्द केले. अधिवेशन सुरु झाल्याने मंत्री महोदय विधिमंडळात व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
सदर निवेदनातून म्हटल्या प्रमाणे, जिल्हाधिकारी यांनी सुयोग्य जागेची निवड करावी असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात घोषणा केली होती. परंतु मागील सहा महिन्या पासून मेडिकल जागेचा घोळ सुरु आहे. हिंगणघाट शहरातील मध्यमार्गातून गेलेल्या मुख्य महामार्गावर उपजिल्हा रुग्णालया व ट्रामा केयर युनिटची भव्य व अत्याधुनिक इमारत उभी असून याच्याच आसपास शासनाची चाळीस एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय व याचं ठिकाणी शासनाचे प्रस्तावित मेडिकल कॉलेज निर्माण झाल्यास हिंगणघाट शहरासोबत चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील हिगणघाटच्या सीमारेषेला लागून असलेल्या भागातील जनतेला ते अतिशय सोयीचे व उपयुक्त होऊ शकते.
परंतु येथील लोकप्रतिनिधी यांनी उपजिल्हा रुग्णालय असलेल्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाची इमारत तयार करून उर्वरित जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा केलेली आहे. व मेडिकल कॉलेज हिंगणघाट पासून 15 किमी अंतरावरील वेळा या गावातील एका खासगी व्यक्तीच्या जागेवर हे मेडिकल कॉलेज उभारण्याची तयारी केलेली आहे. हा द्राविडी प्राणायाम कशा साठी? यामुळे मेडिकलच्या विध्यार्थी वर्गाला प्रचंड मानसिक त्रास होणार आहे. सरकारी जागा उपजिल्हा रुग्णालयाजवळ मेडिकल कॉलेजसाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतांना सुद्धा वेळा या दूरच्या ठिकाणी एका खासगी व्यापाऱ्याच्या जागेवर मेडिकल कॉलेज उभारण्या उपदव्याप कशासाठी? असा प्रश्न कुबडे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्य म्हणजे शासकीय जी आर नुसार सदर मेडिकल कॉलेज हे हॉस्पिटल संलग्न असे राहणार आहे. मग उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणारे 430 खाटाचे हॉस्पिटल व ज्या ठिकाणी हे प्रस्तावित कॉलेज उभारण्यात येणार आहे त्यां ठिकाणी ही शासकीय जी आर नुसार 430 खाटाचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे का?
मग एका तालुक्याच्या ठिकाणी एकाचवेळी आठशे खाटाचे हॉस्पिटल व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होणार आहे का? या गंभीर प्रकरणी शासनाने त्वरित लक्ष देऊन काही जबाबदार व्यक्तींनी चालविलेली ही हातचालखी सरकारने लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. स्थान निश्चितीबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू असल्यामुळे मतदार संघातील जनतेत संभ्रम निर्माण होऊन वेळा येथे होणाऱ्या मेडिकल कॉलेज बाबत जनतेत असतोष निर्माण झालेला आहे.
हिंगणघाट शहराच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागेच शासनाची ४० एकर उपलब्ध असुन सर्व ७/१२ आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. आमदार समीर कुणावर यांचा दुजोऱ्याने हे महाविद्यालय वर्धा रोड वरील वेळा ह्या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्याचा १८० एकर जागेमधून दान स्वरूपात मिळालेल्या ४० एकर जागेवर होत आहे असे वृत्त प्रसारित झाल्यामुळे शहरातील लोकांचा तोंडाचा घास पळवण्याचा प्रकार होताना दिसत आहे. हा एक प्रकारचा लोकांवर अन्यायच आहे अशी भावना व्यक्त होत आहे.
मेडिकल कॉलेजसाठी उपजिल्हा रुग्णालयाची जागाच केंद्रबिंदू राहील त्यामुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या सर्व ग्रामीण भाग आणि आजूबाजूच्या इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना ते स्थान कमी वेळेत पोहचण्यास मदत होईल आणि शहराचा सुद्धा झपाट्याने विकास होईल.
मेडिकल कॉलेज हे जिल्हा रुग्णालयालाच लागून असायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थांना त्रास होणार नाही. जिल्हा रुग्णालय हे शहरात आणि मेडिकल कॉलेज हे शहराचा बाहेर अशी स्थिती महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच निर्माण होत आहे ते सुद्धा एका स्थानिक मोठ्या उद्योगपती नेत्याचा आर्थिक फायद्यासाठी आणि त्या नेत्याचा जवळचा उद्योगपती लोकांसाठी. ह्यामुळे शहर वासियांवर हा एक अन्याय होणार आहे.
रुग्णालय हिंगणघाटला व डॉक्टर चे निवास स्थान व शिक्षण 15 किमी अंतरावर याचा रूग्ण सेवेवर विपरीत परिणाम होवून वेळप्रसंगीं अनेकांच्या नशीबी मृत्यू येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती गजू कुबडे यानी निवेदनातून व्यक्त केली आहे. हिंगणघाट ला उपजिल्हा रुग्णालया जवळ आवश्यक त्यापेक्षा जास्त शासकीय जागा असताना वेळा येथील येथील खाजगी जागेसाठी लोकप्रतिनिधी चा हट्ट संशयास्पद आहे. सरकारने या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या सद्याच्या जागेवरच मेडिकल कॉलेज मंजूर करावे अशी आग्रहाची विनंती निवेदनातून केली आहे.
या निवेदनच्या प्रती मुख्यमंत्री, वैद्धकीय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, खासदार अमर काळे यांना दिल्या आहेत. निवेदन देताना प्रहारचे वर्धा जिल्हाप्रमुख सुरज कुबडे, अतुलभाऊ जाधव, देवा धोटे, मिलिंद गोमासे, अजय ठाकरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.