मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराला जोरदार धक्का देत लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांना दिल्लीत राहण्यासाठी घर अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे खासदार काळे यांना पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आपले एक घर सुचवून तेथे राहण्याची ऑफर दिली. मात्र नव्यानेच खासदार झालेले अमर काळे यांनी शरद पवार यांची ही ऑफर नम्रपणे नाकारली. अमर काळे यांनी स्वत: ही माहिती दिली असून नकार देण्यामागे काही ठोस कारण नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात कट्टर काँग्रेसी असलेले अमर काळे यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादी मध्ये आणून त्यांना वर्धा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यात अमर काळे यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढत मोठ्या मतधिक्याने विजयश्री खेचून आणली. खासदार म्हणून निवडून अमर काळे हे पहिल्यांदाच दिल्लीत गेले. खासदारांना हक्काचे घर असते पण सध्या त्यांना शासकीय निवास देण्यात आले नाही.
खासदारांना राहण्यासाठी दिल्लीत निवास दिले जातात. मात्र सध्या खासदारांना निवासांचे वाटप न झाल्याने नव्याने विजयी झालेले खासदारांनी आपला मुक्काम महाराष्ट्र सदनात ठेवला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश खासदार सध्या तेथेच राहत आहेत. खासदार अमर काळे यांना निवास मिळाले नसल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राहण्याासाठी आपले एक घर सुचविले. त्या घरात पवार यापूर्वी राहत होते. तेथे राहण्याची ऑफर शरद पवार यांनी अमर काळे यांना दिली, मात्र खासदार अमर काळे यांनी ही ऑफर विनम्रपणे नाकारली.
शरद पवार आणि वर्धा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांच्यात कौटुंबिक स्नेहाचा धागा आहे. काळे यांचे सासरे अशोक शिंदे यांचा पवार कुटुंबाशी घरचे संबध आहेत. केंद्रात 14 वर्षे कृषिमंत्री राहिलेले अण्णासाहेब शिंदे यांचे अशोक शिंदे हे सुपुत्र होत. इतकेच नव्हे तर अण्णासाहेब शिंदे प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून पवार हेच जबाबदारी संभाळत आहेत. या नात्याने शरद पवार आणि खासदार अमर काळे यांचे नाते सासरे – जावयाचे आहे. त्यामुळेच तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी स्वतःचे घर ऑफर केले असावे, अशी चर्चा सुरु आहे.