पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 20 एप्रिल 2017 रोजी एका 16 वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची संपूर्ण राज्याला हादरविणारी घटना नागपूर शहरातून समोर आली होती. आज नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल परित करत 7 नराधम आरोपींना मरेपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे या मुलीला आज खरच न्याय मिळाला आहे.
नागपूर शहरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहातून पळून आलेल्या या 16 वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलीवर 7 नराधमांना रात्रभर अत्याचार केला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने (पोक्सो विशेष) मरेपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, प्रत्येकी 18 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर, त्यांना मदत करणाऱ्या चार आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. न्या. पी. पांडे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला. यात नराधम 1) बाबा ऊर्फ अतुल ऊर्फ नरेश जनबंधू वय 29 वर्ष, रा. कुशीनगर, जरीपटका, 2) फिरोज अहमद जमिल अहमद वय 47 वर्ष, रा. तहसील, 3) चिंट्या ऊर्फ स्वप्नील देवानंद जवादे वय 34 वर्ष, रा. राहुलनगर, सोमलवाडा, 4) मयूर रमेश बारसागडे वय 30 वर्ष, रा. इंदोरा लघुवेतन कॉलनी, 5) कृष्णा हरिदास डोंगरे वय 31 वर्ष, रा. गौतमनगर, खामला, 6) जीतू ऊर्फ चन्नी रमेश मंगलानी वय 29 वर्ष, रा. व्यंकटेशनगर, खामला आणि 7) सचिन गोविंदराव बावणे वय 29 वर्ष, रा. दर्ग्याजवळ, कुंभारटोली असे या नराधम आरोपींची नावे आहेत. याच प्रकरणात आरोपींना साहित्य पुरविणारे प्रलय चंदू मेश्राम व सोमिल अशोक नरखेडकर तसेच चौकीदार सुरेश दामोदर बारसागडे आणि मनोहर अडकू साखरे यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
काय आहे ही घटना… पीडित अनाथ अल्पवयीन मुलगी घटनेच्या वेळी 16 वर्षांची होती. काटोल रोडवरील वसतिगृहातून पीडितेसह 4 अल्पवयीन मुली 20 एप्रिल 2017 रोजी सकाळी तेथून पळाल्या. रात्री त्या सीताबर्डीतील एका दुकानाच्या आडोशाला थांबल्या आणि 21 एप्रिलला सकाळी त्यापैकी तिघी निघून गेल्या. ही मुलगी याच भागात थांबली होती. रात्री 10 वाजता ती सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या परिसरात असलेल्या मॉल जवळील फुटपाथवर बसून होती. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे रडत होती. त्यावेळी आरोपी फिरोज, त्याच्या दुकानातील नोकर मयूर, बाबा आणि चिंट्या तिच्यावर नजर ठेवून होते. या चौघांनी तिला का रडते, अशी विचारणा केली. तिने खूप भूक लागल्याचे सांगताच आरोपींनी जेवणाचे आमिष दाखवून चिंट्याच्या ऑटोत बसवले आणि त्यानंतर तिला जरीपटक्यातील सुगतनगर मधल्या बांधकाम सुरू असलेल्या प्रतीक्षा अपार्टमेंटमध्ये नेले. तेथे तिच्यावर चारही नराधमांनी रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला. पहाटे चारच्या सुमारास आरोपींनी तिला ऑटोत बसवून पुन्हा सीताबर्डीत आणून सोडले. त्यानंतर सीताबर्डी येथून दुसऱ्या दिवशी अन्य तिघांनी तिला बळजबरीने आपल्यासोबत खामला येथे नेले. खामला परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व परत सीताबर्डी परिसरात आणून सोडले. सकाळी या भागात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला तिची अवस्था बघून संशय आला. अल्पवयीन निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे कळताच पोलिस यंत्रणा हादरली होती. याप्रकरणी न्यायालयाने एकूण 24 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. शासनातर्फे ॲड. माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.