आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा कधी अस्मानी तर सुलतानी संकट यातून हातातोंडाशी आलेले पीक हातातून जात होते. म्हणून पारंपरिक पीक पध्दतीमध्ये बदल करून हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी येथील युवा शेतकरी विद्याधर खोडे यांनी 10 लाखाचे भरघोस रेशीम उत्पादन घेतले.
रेशीम उद्योग सुरू करण्याआधी विद्याधर खोडे हे खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबिन, तूर अशा पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पादन घेत होते. परंतु, खर्च वजा हाती काही शिल्लक राहत नव्हते. यांनतर त्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करावा म्हणून भाजीपाला पीक घेण्यास सुरूवात केली. परंतु अनेकदा अवकाळी पावसाचा फटका बसून हाती आलेले पीक उध्वस्त होत होते.
शेतकरी विद्याधर खोडे यांना रेशीम शेतीची माहिती भोजराज खोडे व अरूण जगताप यांच्याकडून मिळाली त्यांनी याची सविस्तर माहिती घेतली. सन 2021-22 मध्ये मनरेगा अंतर्गत रेशीम तूती लागवड करून रेशीम शेती करण्यास सुरूवात केली. पहिल्याच वर्षी पहिल्या पिकामध्ये 95 किलो कोष उत्पादन करून निव्वळ नफामधून 55 हजार रूपयांमध्ये कोष विक्री केली. कच्चे ताडपत्रीचे किटक संगोपनातून विक्रमी कोष उत्पादन करून नफा मिळविला.
मनरेगा योजनेमधून त्यांनी पक्के किटक संगोपनगृह बांधकाम करून 4 ते 5 बॅचेस मधून प्रत्येक बॅचेसला 80 ते 90 हजार रूपयांचा आर्थिक मोबदला कमवित आहेत. आजघडीला त्यांच्याकडे 12 बॅचेस असून त्यामधून 10 लाखांचे वार्षिक उत्पन्न घेत आहेत. मनरेगा योजनेतून श्री. खोडे यांना मिळालेली आर्थिक साथ यामुळे त्यांचा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलेला असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. श्री. खोडे यांनी रेशीम शे तीमध्ये केलेली प्रगती पाहून गावातील अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे.