संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्यामुळे महसुल विभागातील कर्मचारी दि.15 जुलै 2024 रोजी पासुन राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, शेतमंजूर, इतर सामान्य नागरिक यांचे महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले व इतर शासकीय कामकाज ठप्प झालेले आहेत. क्षेत्रातील जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे संपात सहभागी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी, मागण्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल विभागाचा ‘आकृतीबंधाचा प्रश्न’ गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र त्याबद्दल अद्यापी कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही, महसूल सहाय्यक या संवर्गाचा ग्रेड पे १९०० वरून २४०० करणे, अव्वल कारकून संवर्गाचे पदनाम बदलून “सहायक महसूल अधिकारी” असे करणे, चतुर्थश्रेणी (शिपाई) या कर्मचा-यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये २५% पदोन्नती देण्यात यावे, कोतवाल पदांना चतुर्थश्रेणी “ड” दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदांचा “पदोन्नती कोटा” वाढवण्यात यावा व इतर विविध मागण्यांच्या अनुषंगाने महसूल कर्मचारी यांचे संबंधीत प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढणे गरजेचे आहे. तरी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना व चंद्रपूर जिल्हा महसुल कर्मचारी संघटना यांच्या वतीने महसुल कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक विविध मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करणेसंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.