इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली इको क्लब च्या विद्यार्थी प्रतिनिधी पदाकरिता सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी असते, त्यातील संपूर्ण यंत्रणा, स्वरूप, चिन्ह वितरण, उमेदवार मतपत्रिका, मतदान कक्ष, मतपेटी, बोटाला शाही लावणे, मतदार यादी आणि संबंधित अधिकारी यांची रचना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुलांच्या गटाला वड, पिंपळ, चिंच अशा वृक्षांची तर मुलींच्या गटाला गुलाब, शेवंती, मोगरा अशा फुलांची नावे चिन्ह म्हणून देण्यात आले होते. एकूण 72 विद्यार्थी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्करराव येसेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची शालेय स्तरावरील सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया समजून घेऊन विद्यार्थी प्रतिनिधी पदाकरिता निवडणूकित उभे असलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर शिक्षिका जयश्री धोटे यांनी मतदान केंद्राध्यक्ष, इयत्ता नववी चे विद्यार्थी मानसी बोबडे व यश कुळमेथे यांनी मतदान अधिकारी म्हणून कार्य बघितले. मुलींची प्रतिनिधी म्हणून अनुष्का रवींद्र वांढरे तर मुलांचा प्रतिनिधी म्हणून जय महेंद्र बुरडकर हे बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवार यांना भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर , शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, रुपेश चिडे, सुनीता कोरडे,अर्चना मारोटकर, नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, विकास बावणे, वैशाली चिमुरकर, मनीषा खामनकर, पूजा बावणे, अंजली कोंगरे ,रणदिवे, आदीं शिक्षकांनी विजयी विद्यार्थी प्रतिनिधी चे अभिनंदन केले. राष्ट्रीय हरित सेना इको क्लब च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. मनोज गौरकार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.