श्याम भुतडा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पहिल्यांदा कोच म्हणून मैदानात उतरलेल्या गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी श्रीलंका विरुद्धची T20 क्रिकेट मालिकेत जोरदार कामगिरी करत मालिकेतील तिन्ही सामने जिंकून भारताला अजिंक्य ठेवले. अखेरचा सामना तर खूप चुरशीचा झाला.
भारताने दिलेल्या १३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून यजमान श्रीलंका सहज सामना जिंकेल असे अपेक्षित होते. मात्र, श्रीलंकेच्या डावातील अखेरच्या काही षटकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी दोन षटकांत चार बळी घेत सामना फिरवला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना म्हणजे एखाद्या चित्रपटातील हास्यास्पद कथाच म्हणावी लागेल. अखेरच्या २ षटकांत अवघ्या ९ धावांची गरज असताना सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंगने ३ धावा देत २ बळी घेतले तर सूर्याने शेवटच्या षटकात केवळ ५ धावा देऊन २ बळी घेण्याची किमया साधली. यामुळे यजमानांना लक्ष्य गाठता आले नाही. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३७ धावा करू शकल्याने सामना अनिर्णित संपला.
मग सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवून ३-० ने मालिका जिंकली. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात अखेरचा सामना झाला.