रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- मागील काही दिवसांमध्ये विनयभंगाच्या घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच बसस्थानक परिसरात अल्पवयीन शाळा महाविद्यालयीन मुली, तरुणी आणि महिलांशी अश्लील शेरेबाजी करणे, त्यांना मोबाईलवर मेसेज करून त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी उभ्या शाळा कॉलेज मधील तरुणी आणि महिलांना उद्देशून शेरेबाजी करणे, एकाकी तरुणींना गाठून लगट करणे, त्यांना स्पर्श करीत विनयभंग करण्याचे प्रकारदेखील घडत आहेत. अनेकदा या शालेय तरुणी अब्रूचा विचार करून तसेच भीतीने तक्रार करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि शाळा कॉलेज रस्त्यावर शाळा महाविद्यालयीन तरुणी सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण होण्याकरिता या ‘रोड रोमियों’ चा बंदोबस्त होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आज रोडरोमियो च्या वाढत्या त्रासामुळे शहरातील बसस्थानक परिसर व शाळा महाविद्यालय यांच्या वेळेनुसार दोन पोलीस कर्मचाऱ्या मार्फ़त नियमित पाहणी करून दोषी विरुद्ध कडक कार्यवाही व्हावी या आशयाचे निवेदन मंठा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. यावेळी बाळासाहेब खवणे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा, प्रा.डॉ.पांडुरंग नवल सर तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड परतूर,आसाराम झोल, प्रदीप उगले, गोविंदराव मानूरकर, आकाश खत्रे, विठ्ठल खराबे आदी उपस्थित होते.