प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सावंगी मेघे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठातील एका एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.
सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस द्वितीय वर्षांत शिक्षण घेत असलेल्या पूजा रजानी हिने महाविद्यालयच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारल्या नंतर पूजाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी इथेच उपस्थित अधिष्ठाता डॉ. अभय गायधने यांनी तिला उचलून रुग्णालयात आणले. त्यानंतर पूजावर उपचार सुरू केले पण तोपर्यंत तिची जीवनयात्रा संपली. उद्या पासून परीक्षा सुरू होत असतांनाच हा प्रकार घडल्याने वैद्यकीय परिसर धास्तावून गेला आहे. परीक्षेचे दडपण, आजार की काही वाद यातून ही आत्महत्या झाली, याबाबत तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.
आपल्या मुलीने महाविद्यालया वरून उडी मारत आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर नागपूर वरून तात्काळ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल झाले. यावेळी पूजाच्या पालकांनी महाविद्यालयात पोहचताच संताप व्यक्त केला. मुलीच्या आत्महत्येने त्यांचा एकच आक्रोश सुरू झाला. त्याच रागातून त्यांनी महाविद्यालयात तोडफोड केली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित कुमार वाघमारे हे म्हणाले की आत्महत्येमागे काय कारण आहे हे पुढे आलेले नाही. मात्र, चौकशी केल्या जाईल. तसेच पोलीस यंत्रनेस सहकार्य करू, असे कुलगुरू म्हणाले. तर विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी पालकांचा संताप तूर्तास शांत झाला आहे. पण प्रकरण गंभीर व दुर्दैवी आहे. असे विद्यापीठात आजवर कधीच झाले नाही. आम्ही सर्व ती काळजी घेत असतो.
नातेवाईकांचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप
वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थीनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर विद्यार्थीनीच्या आई वडिलांनी व्यवस्थानावर ताशेरे ओढत फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे कारण पुढे करून विद्यार्थीनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई आणि मामा यांनी केला आहे.