हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर दि.8:- चंद्रपूर जिल्ह्यातील 2023-24 मधील ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा नाकारण्यात आला आहे, त्यांना पात्र ठरवून 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात पीक विमा योजनेची नुकसान भरपाईची रक्कम जमा करावे, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीचे बोलत होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील 2023-24 मधील खरीप हंगामात 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पश्चात तसेच नंतरही सर्व्हे झाला नसल्याचा तक्रारी केल्या होत्या. तसेच विमा कंपनीने पंचनामा व सर्वे न करताच शेतकऱ्यांना अपात्र ठरवल्याच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या. त्यांना नुकसान भरपाई पोटी 208 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 80 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून 127 कोटी रुपयांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
पिक विमा कंपनीने वेळेत अपात्रतेची कारणे दिलेली नाहीत. त्यामुळे अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पात्र करावे लागेल. तसेच 31 ऑगस्ट पूर्वी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. या बैठकीस कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती राधा कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण विनयकुमार आवटे, विभागीय कृषी संचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.