प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.12:- रेशीम उद्योगातून एक लाख रुपया पेक्षा जास्त उत्पन्न घेतलेल्या जिल्ह्यातील तीन शेतक-यांना उच्च शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार वितरण समारंभाला वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा, रेशिम संचालनालयाच्या संचालक वसुमना पंत, रेशीमच्या अतिरिक्त आयुक्त माधुरी चवरे, उपायुक्त श्री. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर व रेशीम संचालनालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील नवीन नियोजन भवन येथे 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधून तुती आणि टसर रेशीम उद्योगातुन ज्यांनी आर्थिक उन्नती एका वर्षात 1 लाखापेक्षा जास्त केली. अशा यशस्वी रेशीम शेतक-यांचा सत्कार करण्यात आला.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातुन सन 2022-23 या वर्षात प्रती एकरी 1 लाखा पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणा-या शेतक-यांची रेशीम रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामधुन सर्वाधिक उत्पन्न घेणा-या शेतक-यांना प्रथम पुरस्कार 11 हजार रुपये, व्दितीय पुरस्कार 7 हजार 500 रुपये व तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, साडी आणि प्रशस्तीपत्र देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली येथील बळवंत तुकाराम घोटेकर, सेलू तालुक्यातील घोराड येथील ज्ञानेश्वर वारलुजी माहुरे व हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी येथील विद्याधर गुलाबराव खोडे या शेतक-यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सत्कार मुर्तीची आस्थेने चौकशी करुन यश कशा पध्दतीने मिळविले आणि रेशीम शेती कशी फायद्याची आहे. हे जाणून घेतले. रेशीम शेतक-यांसाठी बाजारपेठ आणि तर सोयी सवलती उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी मंत्री महोदयांचे हस्ते रेशीम संचालनालया च्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या संकेत स्थळावर रेशीम उद्योग विषयी सर्व माहिती, जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी, संपर्क क्रमांक, शासन निर्णय आदी माहिती उपलब्ध असणार आहे.
या कार्यक्रमाला रेशीम कक्ष मंत्रालयातील उपसचिव श्रध्दा कोचरेकर, कक्ष अधिकारी अंजुम पठाण, रेशीम विभागाचे उपसंचालक. महेंद्र ढवळे, सहायक संचालक हेमंत लाडगावकर, रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे, आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड यांची उपस्थिती होती.

