संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- वन्यजीव प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे होणारे नुकसान भरपाई मिळण्याकरिता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येते या योजनेत गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र मौजा चेकसोमनपल्ली, टोलेनांदगाव, हेटीनांदगाव, कोंढाणा, व्यंकटपुर, गोंडपिपरी, राळापेठ, कोरंबी, चेकलिखितवाडा, पानोरा, मक्ता, पेपरपेठ, विठ्ठलवाडा, सुरगाव, येनबोथला, फुर्डीहेटी, तारसा बुर्ज, तारसा खुर्द, नवेगाव वाघाडे, भणारहेटी, तारडा, कुलथा, नांदगाव इत्यादी २५ गाव या योजनेतून सुटलेली होती.
सदर गंभीर बाब स्थानिक नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या निदर्शनास आणून दिली आणि वरील योजनेत ही गावे समाविष्ट करण्याची मागणी केली. आ. सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांसाठी क्षणाचाही विलंब न करता तातडीने वनविभागाचे प्रधान सचिव आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश येऊन वरील २५ गावांचाही समावेश योजनेत समाविष्ट करण्यात आला असून या गावातील नागरिकांनाही वन्यजीव प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर निवड झालेली नवीन गावे महाडीबीटी पोर्टल वर कार्यान्वित झालेली आहेत. तेव्हा या गावातील वन्यजीव प्राण्यांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.