✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका युवतीने शारीरिक संबंधास नकार दिल्याने एका नराधमाने त्या तरुणीचे अश्लील फोटो व मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करीत तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोहन बंजारा रा. नंदुरबार याने 1 जून ते 19 सप्टेंबर 2022 दरम्यान विनयभंग केला असून, त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेताना पीडित व संशयिताची ओळख झाली होती. पदवी शिक्षणासाठी संशयित नाशिकमध्ये आला होता. काही महिने दोघांमध्ये घनिष्ट संबंध होते. मात्र कालांतराने दोघेही वेगळे झाले. त्यानंतर संशयिताने पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली. पीडितेने त्यास भेटण्यास नकार दिल्याने संशयिताने पीडितेचे फोटो व मेसेज इन्स्टाग्रामवरील सात बनावट खात्यांवरून व्हायरल केले व पीडितेच्या नातलगांसह मित्रमंडळींच्या व्हॉट्सअपवर पाठवून विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली ठाण्यात रोहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.