मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विदर्भ विमुक्त भटके, आदिवासी संयोजन समिती” च्या महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रे निमित्ताने हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव (बोरगाव) येथील आदिवासी कोरकू-गोंड वस्तीवर जनजागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीचे नियोजन मंगला लोखंडे अध्यक्ष, गंगाई बहुउद्देशीय संघटना हिंगणघाट यांनी केले, तर सदर बैठकी मध्ये विमुक्त भटके आदिवासी संयोजन समितीची भूमिका आणि महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रे बाबत माध्यम साक्षरता संस्थेचे संस्था प्रमुख विजय पचारे यांनी मांडली आहे. आदिवासी कोरकू समूहाच्या समस्यांचे निवेदन गाठोड्याच्या स्वरूपात तयार करण्यात आले असून ते गाठोडे महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारला व मंत्रालयात पाठवायचे आहे.
१) आदिवासी कोरकू-गोंड समूहाला हक्काचे घर पट्टे मिळावे.
२) प्रत्येक कुटुंबाला घरकुल योजना मिळावी.
३) जातीचे दाखले, जन्म नोंदी व इतर दाखले मिळण्यासाठी शासनाने मदत करावी.
४) रोजगारासाठी वारंवार होणारे स्थलांतर सरकारने थांबवावे. अशा प्रकारच्या मागण्यरूपी समस्यांचे गाठोडे हे येत्या १५ सप्टेंबर २०२४ ला मा. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत निवेदनाद्वारे पोहचविले जाणार आहे.
याच उद्देशाने महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रे मध्ये वर्धा जिल्ह्यातील आदिवासी व विमुक्त भटके समूह आणि ईतर व्यक्ती, संस्था व संघटना ज्या आदिवासी भटक्या समूहासाठी काम करत आहे अशा सर्वच व्यक्ती संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी जनजागृती पर चर्चा सत्रे व नियोजन बैठका करण्यात येत आहे. याच धर्तीवर गंगाई बहुउद्देशीय संस्थेने सदर बैठकीचे नियोजन केले होते. सरकारने आमच्या हक्काची जाणीव ठेवावी, आमच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांची व्यवस्था करावी, असे म्हणत येथील महिलांनी पुढील यात्रा यशस्वी होण्यासाठी कंबर कसलेली आहे.
कोरो इंडिया, मुंबई द्वारा संचालित ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रमाचे लीडर आकाश दुर्गे यांनी सदर बैठकी साठी परिश्रम घेतले तर यावेळी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानून यात्रेचे पुढील नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला.