आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नदी, नाले, जलाशये मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागत आहे. त्यात वर्धा जिल्हातील पुलगाव येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास पुलगाव येथे पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे. असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
एक महिला व एक पुरुष, असे दोघे दुचाकीद्वारे पुलगाव येथून निघाले होते. पुलावर आले असतानाच त्यांची दुचाकी पाण्याच्या प्रवाहात घसरत गेली व शेवटी महाकाय पात्रात वाहून गेली असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथक रवाना झाली. वाहून गेलेल्या स्त्री-पुरुषाची ओळख पण पटलेली नाही. केवळ लाल रंगाची स्कुटी असल्याचे सांगितल्या जाते. सायंकाळी अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या सकाळी परत नागपुरातून विशेष पथक आल्यानंतर शोध घेतला जाणार आहे.
शनिवारी रात्री आजोबा व नात हे पुरात वाहून गेले होते. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ४८ तास उलटूनही शोध न लागल्याने बचाव पथक उद्या सकाळी परत शोध घेणे सुरू करतील. हिंगणघाट तालुक्यात चाणकी या गावी ही घटना घडली होती. कानगाव येथील बाजार आटोपून लाला सुखदेव सुरपाम तसेच त्यांची नऊ वर्षीय नात नायरा साठोणे हे दोघे गावी चाणकीसाठी परत निघाले होते. गावाच्या पुलावरून जात असतानाच पूल खचला. खाली पाडून पुराच्या प्रवाहात ते वाहून गेले. रविवारी सकाळपासून त्यांचा शोध घेणे सुरू झाले. पाण्याचा प्रवाह जलद असल्याने बचाव पथकास नौका पाण्यात टाकणे अवघड झाले होते. पण काही काळाने पथकाने दहा किलोमीटरचा परिसर तपासला. आज सायंकाळी शेवटी शोध मोहीम थांबविण्यात आली. उद्या, मंगळवारी सकाळी परत शोध घेणे सुरू होईल, अशी माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली आहे.